औरंगाबाद : लोकसभा निवडणुकानंतर विधानसभा काबीज करण्याकरिता राष्ट्रवादी जोमाने कामाला लागलेली आहे. नुकतेच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. यात जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांकरिता तब्बल 36 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या मुलाखती आज सोमवारी राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात येत आहेत. हे वृत्त देईपर्यंत 16 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हवे तसे यश प्राप्त न झाल्याने विधानसभा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याकरिता इच्छुक असलेल्यांना 27 जून ते 1 जुललैदरम्यान ऑनलाईन व जिल्हाध्यक्षांकडे अर्ज करण्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्यातून तब्बल 36 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. राज्यभरातील 288 जागांकरिता मुलाखती घेण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज सोमवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी भवन येथे जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुलाखतीस प्रारंभ करण्यात आला. पक्ष निरीक्षक अविनाश अधिक, आ. राजेश टोपे, आ. विक्रम काळे आदी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. यासाठी जिल्हाभरातून इच्छुक व त्यांचे समर्थक राष्ट्रवादी भवन येथे दाखल झाले होते. राष्ट्रवादीकडे गंगापूर, वैजापूर, पैठण, औरंगाबाद मध्य हे मतदारसंघ येत असले तरी सर्वच मतदारसंघातील इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. वृत्त देईपर्यंत औरंगाबाद मध्य, पूर्व-पश्चिम, वैजापूर आदी विधानसभा मतदारसंघातील 16 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.